कोल्हापूर महापालिकेत शिंदेसेनेची आघाडी, अनेक प्रभागांत ‘आयात’ उमेदवारांना तिकीट..
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील शिंदेसेनेने मंगळवारी दुपारी आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र व पुतणे, तसेच काँग्रेसमधून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीने एकत्रितपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच शिंदेसेनेने प्रभागनिहाय उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे.
कसबा बावडा परिसरातील प्रभाग क्रमांक १ आणि २ मधील सर्व आठही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार उतरवण्यात आले आहेत. या ठिकाणी महायुतीतील भाजप तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या इच्छुकांना शिंदेसेनेच्या तिकिटावर संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे चिन्ह सलग असताना महायुतीची दोन वेगवेगळी चिन्हे झाल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीत शिंदेसेना आणि भाजप यांच्यात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच झाल्याचे चित्र आहे. जागावाटपाच्या तडजोडीत शिंदेसेनेच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षप्रवेश केलेले शारंगधर देशमुख, आस्कीन आजरेकर, अशोक जाधव यांच्या पत्नी, प्रकाश नाईकनवरे, अजय इंगवले, सत्यजित जाधव, अभिजीत खतकर, ओंकार जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अजित पवार राष्ट्रवादीतून आलेल्या अनुराधा खेडकर आणि शिवतेज खराडे यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांत शिंदेसेनेचे जुने, निष्ठावंत इच्छुक रिंगणाबाहेर राहिले आहेत.
माजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या पत्नी, माजी महापौर सुनील कदम यांचे पुत्र, माजी महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार मोरे, तसेच माजी नगरसेवक रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता पोवार अशा अनेक माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
What's Your Reaction?